नवीन व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग कसे करावे?

नमस्कार, मी वेदार्थ. मी २०१४ साली, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी, माझे वडील श्री. श्रीराम देशपांडे यांच्यासोबत देशपी इंटरनेट या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सतत डिजिटल मार्केटिंग व इंटरनेट या क्षेत्रात काम करतोय. एकटा घरी बसून लॅपटॉपवर काम करण्यापासून मी सुरुवात केली आणि आता आपण एक जलद गतीने वाढणारा कंपन्यांचा ग्रुप आहोत.

मला बऱ्याच वेळा हा प्रश्न केला जातो कि एका नवीन व्यवसायाचे किंवा जुन्या, पण ऑफलाइन व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग कसे करावे? मी नेहमी या प्रश्नाचे उत्तर देतो कि- तसेच जसे तुम्ही कोणतेही मार्केटिंग करता. डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास करा, स्वतः शिका, योग्य लोकांची मदत घ्या व सतत प्रयत्न करत राहा.

 

डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास करा

डिजिटल मार्केटिंग हा विषय कुठल्याही विषयाप्रमाणे समजायला सुरवातीला थोडा कठीण आहे. पण अशक्य मात्र नक्कीच नाही. कोणीही, अगदी एका विद्यार्थ्यापासुन ते जेष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही डिजिटल मार्केटिंग करू शकतो. 

सुरुवात हि नेहमी जिज्ञासेतून होते. तुम्ही मनात ठरवले पाहिजे कि तुम्हाला नक्की काय करायचे आहे आणि त्यानुसार गुगलवर जाऊन त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. अगदी वेबसाइट बनवण्यापासून ते फेसबुक वर जाहिरात करण्यापर्यंत, डिजिटल मार्केटिंग खूप आकर्षक आहे. Udemy.com हि वेबसाइट डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी खूप छान आहे.

 

स्वतः शिका

तुमच्या व्यवसायाचा विचार करा. स्वतः तुम्ही तो पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय चालवू शकणार आहात का? नाही ना? तसेच डिजिटल मार्केटिंग चे आहे. स्वतः शिकल्याशिवाय व केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही  अगदी जरी कोणाला तुमच्या व्यवसायाच्या डिजिटल मार्केटिंग चे काम दिले, तरी तुम्हाला काय काम करणे गरजेचे आहे, त्यातून काय फायदा होईल हे समजलेच पाहिजे.

म्हणून अगदी प्राथमिक का होईना, पण तुम्ही स्वतः डिजिटल मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही स्वतः ची वेबसाइट निशुल्क wix.com या साधनाद्वारे बनवू शकता. मग आपल्या व्यवसायाचे गुगल, फेसबुक वर लिस्टिंग करून आपल्या व्यवसायाविषयी मजकूर पोस्ट करू शकता. व्हाट्सअप व ई-मेल द्वारे तुम्ही छान संदेश लिहून आपल्या ग्राहकांना पाठवू शकता. 

 

योग्य लोकांची मदत घ्या

मान्य करा- तुम्ही सर्व गोष्टी स्वतः करू शकत नाही. शेवटी कधी ना कधी तुम्हाला स्वतःचा व्यायसाय मोठा करण्यासाठी तज्ञ लोकांची मदत घ्यावीच लागणार आहे. जशी Land Rover गाडी स्वतात येत नाही, त्याचप्रमाणे खरंच तज्ञ लोक तुमच्यासाठी स्वस्तात काम करणार नाहीत. त्यामुळॆ निश्चय करा की तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवायचा आहे आणि त्यानुसार योग्य लोकांची मदत घ्या. अगदी आपल्या सॅटर्डे क्लब मधेही योग्य डिजिटल मार्केटिंग संस्था तुम्ही शोधू शकता.

 

सतत प्रयत्न करत राहा

जर डिजिटल मार्केटिंग सोपं असत, तर मग सगळ्यांनीच यशस्वीपणे केलं असत, नाही का? सतत, म्हणजे अगदी काही वर्षीसुद्धा डिजिटल मार्केटिंग करण्याची तयारी ठेवा. वेळ लागू शकतो, पण योग्य प्रकारे केलंत, तर त्याचे परिणाम खूपच लाभदायी ठरू शकतात. Socinova.com चेच उदाहरण घ्या- आधी मला २ वर्ष खूप कष्ट करावे लागले डिजिटल मार्केटिंग साठी, पण आता आपण गुगल वर विविध 'keywords' साठी पहिल्या पाच परिणामांमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याला आता जगभरातून ग्राहक मिळतात. माझ्यासारख्या एका सध्या तरुणाने हे केल, मग तुम्ही पण नक्कीच करू शकता. 

 

हे चार मुद्धे म्हणजेच सगळं डिजिटल मार्केटिंग आहे का? नाही. हि फक्त एक सुरुवात आहे. डिजिटल मार्केटिंग हे एक खूप मोठ व आकर्षक विश्व आहे. आणि ते शिकणं हि एक वेगळीच मजा आहे. मला तुम्हाला तुमच्या या नवीन मोहिमेत नक्कीच मदत करायला आवडेल. तुम्हाला शिकवण्याइतका तर मी काही मोठा नाही, पण तुमचा मार्गदर्शक सुद्धा होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल.

चला तर मग, या नवीन adventure ची सुरुवात करूया!

 

- वेदार्थ देशपांडे, सरव्यवस्थापक, देशपी